औरंगाबाद : बनावट सोने बँकेत ठेवून बँकेला गंडा घालणारे एक रॅकेट उघड झाले आहे. यात भामट्यांनी बँकेत खोटे सोने तारण ठेवले आणि तब्बल दोन कोटी रुपयांवर कर्ज उचलल्याची बाब पुढे आली आहे. अनेकांनी अशा पद्धतीने काही बँकांना फसविल्याचा पोलिसांना संशय आहे. लोखंड, पितळ, चांदी, यांना सोन्याचा मुलामा लावून हे दागिने बँकेत ठेवण्यात आले आणि त्यावर कोट्यवधींचे तारण कर्ज घेण्यात आले. औरंगाबादेतील तीन बँकांना या पद्धतीने फसविल्याचे पुढे आले आहे. अशा पद्धतीने तब्बल १५ लोकांनी बँकेला फसवले असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. या भामट्यानी बँकेच्या सोन्याचे मूल्यांकन करून देणाऱ्या सोनाराला हाताशी धरून हा प्रक्रार केला आहे. गेली काही वर्ष हा प्रकार सहास सुरु होता आणि बँकेला सुद्धा या प्रकाराची कुणकुणही लागली नाही, हे धक्कादायक आहे. पोलिसांनी या प्रकरणात सोन्याचे मुल्याकंन करून देणाऱ्या सोनारालाही अटक केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.बँकेला फसविणारे १५ आरोपी आहेत. हे सगळे फरार आहेत. पोलिसांनी जी चौकशी केली, त्यात हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस आता इतर बँकाकडेही चौकशी करीत आहेत. बँकांनीही हे रॅकेट पकडण्यासाठी मदत करावी आणि बँकेतील ठेवलेल्या सोन्याचे ऑडीट करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.खोटे सोने देवून बँकेचीच फसवणूक करण्यामागे सोनाराचा हात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता सोनाराव किती विश्वास ठेवायचा, अशी चर्चा सुरु झाली आहे. बँकांनी फक्त सोन्याचे मुल्याकने करून देणाऱ्या सोनारावरच विश्वास ठेवला आणि स्वत:ची फसवणूक करुन घेतली. याचाही तपास करणे गरजेचे आहे.