नागपूर : जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या निधीला कमी करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, तो निधी कमी करु नये. नाहीतर याचा नागपूरच्या विकासावर मोठा परिणाम होईल अशी मागणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्य सरकारला केली. नागपूरच्या विकासासाठी ७७६ कोटी निधी दिला जातो. तो कमी करण्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री आणि नागपुरातील तीनही मंत्र्यांना माझी विनंती आहे की, हा निधी ७७६ कोटी वरुन ८५० कोटी केला पाहिजे. नागपूर ही उपराजधानी आहे, त्याचं विशेष महत्त्व आहे. नागपूरला अधिवेशन होतं, मोठ्या प्रमाणावर नागपूरवर भार असतो. नागपूरच्या सर्व विकासयोजना ज्या डीपीसीकडे चालतात, त्या निधी अभावी कमी होतील. त्यामुळे हा निधा ८५० कोटी करावा, अशी मागणी चंद्रकांत बावनकुळे यांनी केली याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार आहोत. याप्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि याबाबत त्यांना विनंती करणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले. तसेच, राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यावर अन्याय करुन नागपूरला फायदा केला नाही, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी केलेला आरोप चंद्रकांत बावनकुळे यांनी फेटाळून लावला.